पावसाळ्यात कोकणात आढळणारी अळंबी चे प्रकार
कोकणात जुलै महिन्यात भरपूर पाऊस पडत असतो व भर पावसातच अत्यंत चवदार, भरपूर प्रथिनांचा स्त्रोत असलेले चार ते पाच अळंबीचे प्रकार कोकणातील जंगलात रुजून येतात. विशेष म्हणजे सतत पाऊस पडला व तापमान २० ते २३°सें.ग्रे. पर्यंत खाली आले की हे अळंबीचे प्रकार रानातील जाळीत किंवा वाळवीच्या ठिकाणी रूजतात. यातील एक दोन प्रजातींच्या स्पाॅनचे कॅरीअर वाळवी आहे. स्थानिक गुराखी, शेतकरी यांना दरवर्षी अळंबी कुठे कुठे रूजते त्या जागा माहित असतात.आम्ही १० वी पर्यंत असताना आमच्याकडे गुरे असल्यामुळे ते चारविण्यासाठी आमच्या परसात किंवा मित्रांबरोबर डोंगरात गुरे चारण्यासाठी सकाळी व सायंकाळी गुरे घेऊन जावे लागत असे.जुलै ऑगस्ट महिन्यात ही अळंबी आम्ही सर्व गुराखी डोंगरातल्या खैराच्या झाडाखाली किंवा इतर झाडांचे बुंदे तसेच वारुळे शोधत फिरत असू की कोणाला कोठे अळंबी मिळते हे पाहण्यासाठी. कोणाला चितळी अळंबी ही कधी पूर्ण उगवणार हे माहीत असते,त्याप्रमाणे आम्ही तेथे झाडाचा पाला बाजूला ठेवून देत असू.याचे कारण ही जेणेकरून दुसऱ्या कोणीही व्यक्ती ने ती नेऊ नये. पाला अळंबी च्या जवळ असेल तर त्या अळंबी ला कोणी हात लावीत नसे, म्हणजे ह्या अळंबीचा मालक वेगळा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच तेथे आम्ही भांडे घेऊन ती अळंबी एक-एक निवडून काढत असू,जेणेकरून पाला पाचोळा,माती त्यामध्ये मिक्स होणार नाही. शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारातील पाककृतीना चवीच्या बाबतीत सहज मागे टाकतील एवढी ही अळंबी चवदार असतात. त्यामुळे ज्यांना ही अळंबी मिळाली ते लोक नशीबवान समजतात. अळंबी ही जास्त काळ टिकत नाही,त्यामुळे ही मिळाल्यावर स्थानिक लोक रसदारभाजी करून चवीने खातात.
स्थानिक अळंबीची नावे पुढील प्रमाणे आहेत.
१) रोवण
२) चुडीये
३) कुरटे
४) कुंबळे
५)चितळे
रोवण ही अळंबी एका जागी फार मोठ्या प्रमाणात येते. उंची साधारणपणे दोन इंच असते. कॅप सफेद रंगाची, व मध्ये जांभळ्या रंग असतो. दांडा stalk मातीतून खणून काढावा लागतो. चवीला अप्रतिम असते. मटणाला उत्कृष्ट शाकाहारी पर्याय आहे. सूप, भाजी, सुकी भाजी, सर्वच प्रकार चवदार व स्वादिष्ट होतात.
चुडीये ही अळंबी लांब लांबीची असते. दांडी ६ ते १८ इंच असते. ही अळंबी काहीशी कमी आढळते. चवीला उत्तम असते. गरम मसाला वापरून भाजी छान होते.
कुरटे ही अळंबी एका ठिकाणी एखादीच solitary सापडते. ब-याच ठिकाणी फिरल्यावर पाच सहा मिळतात. चव छान, कालवण उत्तम होते.
कुंबळे ही अळंबी चुडीये प्रकारासारखीच असते. मात्र लांबीला कमी असते. चव चांगली असते पण दुर्मिळ प्रजाती आहे.
चितळे ही अळंबी नाकातील फुल्ली सारखी नाजूक व खूप लहान असते. वारूळावर रूजते. अलगद काढून चांगली सर्वत्रच धुवून घ्यावी लागते. याचे सूप, कालवण व भाजी छान होते. चवदार व स्वादिष्ट लागते.
रायगड जिल्ह्यात आदिवासी कातकरी बांधवांची वस्ती असलेल्या श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात यातील अळंबीचे प्रकार स्थानिक बाजारात आदिवासी बांधव विक्रीसाठी आणतात. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात ही स्थानिक अळंबी बाजारात मिळत नाही.ज्याला मिळेल तो त्याची भाजी करून खातो.कारण त्याची चव अप्रतिम लागते.
निसर्गाने कोकणाला ही मौल्यवान भेटी दिली आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील मोजक्याच लोकांना या अळंबीची चव चाखता येते.
अळंबी ही बुरशी वर्गीय असल्याने त्याचे आयुष्य खूप कमी म्हणजे एक दिवसच असते. त्यानंतर त्यात लहान लहान किटक निर्माण होतात. मात्र फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास ती दीर्घकाळ टिकू शकतात.
अळंबीचे बी हे सूक्ष्म स्पॉन स्वरुपात असतात व ते अळंबीच्या कॅपमध्ये असतात.
सौजन्य- सोशल मीडिया-सुरेंद्र माने,फोटो-सोशल मीडिया
संकलन-विलास (भाई )महाडीक
९४२२३७६४३५
धन्यवाद!
आवश्यक माहिती .कारणआऴंबि मध्ये काहिशा विषारी जाति आहेत
ReplyDeleteखुप छान लिहीले आहे
ReplyDeleteखुप छान लिहीले आहे
ReplyDeleteखूपच छान माहिती
ReplyDelete-रमेश खरबस अकोले(जि.नगर)