चिपळूणातील -पेढे मोरेवाडी येथील डोंगर हिरवाईने सजणार.

          श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग जि. रायगड यांच्या प्रेरणेने श्री समर्थ बैठक चिपळूण यातील पेढे-माळीवाडी,मोरेवाडी,कुंभारवाडी व चिपळूण मधील काही सदस्यांनी पेढे-मोरेवाडी डोंगरावर स्वतः वृक्ष लागवड केली आहे,स्वतः लहान मुलांप्रमाणे जोपासना करून ती झाडे वाढविली आहेत. पेढे मोरेवाडी येथील डोंगर हा तीव्र उताराचा माणसांना सुद्धा चालताना तोल जातो की काय अशा प्रकारचा.पूर्वी या ठिकाणी या वाडीतील गुरे चरण्यासाठी  हा मोकळा माळरान वापरला जायचा. आज गुरे कमी झाली,वाडीतील मुले चिपळूण बाजारात कामाला लागली  त्यामुळे गुरे चारणे व पाळणे कमी झाले. ह्या माळावर  श्री समर्थ बैठक चिपळूण परिवारातील श्री सदस्य यांनी हा उजाड माळरान हिरवे करण्याची तयारी केली.व करणारच या इर्षेने. मागील 3 वर्षांपासून मी हे स्वतः तेथे जाऊन त्या लोकांशी चर्चा करून त्यांची अपार मेहनत पहात आलो आहे. त्या लहान झाडांची लहान मुलांप्रमाणे जोपासना चालू आहे. तीव्र उतार असल्याने दरवर्षी झाडाच्या बुंध्यात घातलेली माती पावसाच्या पाण्याबरोबर खाली वाहून येते. तरीही झाडे जगविणे व त्यांचे संगोपन करणे हे श्री समर्थ बैठक चिपळूण म्हणजेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा  यांचे ते ब्रीद वाक्य आहे असे वाटते
             कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यापासून या परिवारातील सदस्य यांनी ४ ते ७ कधी ७.३० वाजेपर्यंत आपापल्या झाडाजवळ जाऊन त्यांची मशागत करत आहेत. जणू झाडांकडे पाहिले तर या माणसांचा झाडांना लहान मुलांप्रमाणे लळा लागला आहे असं वाटतं. ती निरागस व टवटवीत....  त्यां सर्व झाडांकडे  पाहिलं की तेथून खाली उतरुच नये अस कोणालाही वाटेल.
                 बैठक परिवारातील सदस्य यांनी काजू, आंबा, फणस, जांभूळ, कोकम, आवळा, बिब्बा, सालवूड साग, करंज, पेरू, अशी १५३ झाडांची लागवड केली आहे. त्यांना रोज पाणी देणे, त्यांच्या बुंध्यातील माती सारखी करणे अशी कामे त्यांची चालू असतात. आजच्या स्थितीत सर्व झाडे चांगली व सुस्थितीत आहेत.आजला ही झाडे जवळ जवळ १० फुटापर्यंत वाढली आहेत.
      कोरोना लॉकडावून मध्ये ह्या सदस्यांनी संध्याकाळी ४.०० ते ७.०० झाडांजवळ जाणे व झाडांच्या बुंध्याशी दगड माती यांचा बांध घालून पावसाळ्यात पावसाबरोबर माती खाली कशी येणार नाही याचे नियोजन करून तेथे ते काम करीत आहेत. त्यातच पेढे कुंभारवाडीतील ग्रामस्थ व श्री परिवारातील सदस्य विनोद व ऋषीकेश पडवेकर यांनी झाडामधील माती खाली येऊ नये व झाडांना मातीचे पुरण मिळावे म्हणून त्यांच्या घरावरील २००० कौले झाडांसाठी  मोफत दिली. श्री सदस्य यांनी ती कौले त्यांच्या घरापासून डोंगराच्या पायथ्याशी स्वतः च्या खर्चाने गाडी करून आणली व तेथून स्वतः डोक्यावर घेऊन झाडापर्यंत नेऊन ठेवली. कोरोना लॉकडाऊन मध्ये हे सदस्य आपापल्या झाडांना चारी बाजूंनी मातीच्या आधारावर चर खणून भक्कमपणे लावण्याचे काम करीत आहेत. या झाडांना पाणी घालण्यासाठी ५०० लिटर ची टाकी डोंगरावर नेऊन ठेवली आहे.त्यामध्ये पाणी नेण्यासाठी  १ एच. पी. चा पंप बसवून त्यामध्ये सकाळ व संध्याकाळी पाणी भरण्याची व्यवस्था केली आहे. टाकी भरल्यानंतर प्रत्येक जण ते पाणी आपापल्या झाडांना देत असतात.
  मागील १५ दिवसांपूर्वी  आम्ही तेथे गेलो होतो. त्या वेळी या  डोंगर उतारावर एक पिंपळाचे बऱ्यापैकी उंच झाड उगवलेले पाहिले. बुंध्यातील माती वाहून गेलेली सर्व मुळे बाहेर आलेली ते पाहून आम्ही यशवंत शिंदे व मी (विलास महाडीक ) तेथे १५ -१६ जण श्री सदस्य झाडांना पाणी व माती घालणे काम चालू होते. तेव्हा आमची ते झाड पाहून चर्चा चालू होती की या पिंपळाच्या झाडाला पार असते तर पुढील बाजूस दिसणारा गोविंदगड व वाशिष्ठी दर्शन येथे बसून सुंदर दिसेल व अनेक लोक येथे पर्यटन व समोरील देखावा पाहण्यासाठी येतील. या वेळी तेथे झाडांची देखरेख करणारे व पाणी घालणारे ग्रामस्थ त्यामध्ये डॉ.पाणकर, संतोष बांदरे, रविंद्र मोरे, महादेव आदवडे, प्रवीण पागडे,व तेथे उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थ यांनी सांगितले की आमचा त्या झाडाला डोंगरावर असणाऱ्या दगडांच्या माध्यमातून तट घालण्याचा विचार  आहे.
   आज दिनांक २ मे या दिवशी परत आम्ही मोरेवाडी डोंगरावर जाण्याचे ठरविले, त्या प्रमाणे उभा डोंगर चालून गेलो. नेहमीप्रमाणे ७ - ८ ग्रामस्थ मागे त्यांना पिंपळ पाराविषयी बोललो होतो तेथे ही सर्व मंडळी डोंगरातील दगड शोधून दगड सरकवत त्या पिंपळाजवळ जपून आणीत होते. कारण डोंगर उतार तीव्र आहे,जर दगड हातातून सटकला तर थेट डोंगराच्या पायथ्याशीच. काही जण डोंगरातील माती खणून  त्या पिंपळ पार आहे तेथे आणून टाकीत होते, काही ग्रामस्थ ते दगडांनी पार बांधत होतो.माझ्याबरोबर यशवंत शिंदे हे त्यांना माती खणून देण्यास मदत करत होते. मी पाण्याच्या टाकीजवळ गेलो तर मागच्या वेळी टाकी पाण्याने भरली होती ती टाकी आज फुटलेली दिसली.आम्ही कुतूहलाने विचारले ही कोणी फोडली? त्यावर डॉ.पाणकर व संतोष बांदरे यांनी सांगितले की पारासाठी दगड आणताना एक दगड या तीव्र डोंगर उतारावरून सटकून सरळ टाकीला धडकले व टाकी फुटली. आम्ही सर्व झाडाजवळ जाऊन काही झाडांचे फोटो काढले. समोर गोविंदगड अगदी स्वच्छ म्हणजे प्रदूषणविरहित हवा असल्यामुळे नजरेत भरत होता. त्या किल्ल्याचे व सूर्यास्त यांचे फोटो काढले. त्यातच समोरून रेल्वे ट्रॅक वरून मालगाडी जाताना दिसली तिचे व्हिडिओ शूट केले. पेढे ग्रामस्थ यांच्याशी या झाडांविषयी माहिती घेता घेता, येथे कोणते प्राणी दिसतात का? यावर येथे सद्या भेकर व ससे येतात. ससे कोकमाची पाने खातात.पाण्याच्या टाकीजवळ असतात. ते पाण्यासाठी येत असणार,आम्ही येथे या प्राण्यांसाठी त्यांना पिण्यासाठी काही तरी व्यवस्था करा.यासाठी आपण टाकी फुटली आहे तिचा चांगल्या कोपऱ्याचा वापर  करून मातीत तो कोपरा ठेवून त्यामध्ये प्राण्यांसाठी पाणी भरून ठेवू शकतो. त्यामुळे या उन्हाळ्यात त्यांची तहान भागू शकते.
         डोंगराच्या पायथ्यापासून पेढे गावातून जाणारा रस्ता ते परशुराम घाटातील हायवे येथपर्यंत पेढे मोरेवाडी येथील ग्रामस्थ यांची जागा आहे. मी संपूर्ण झाडे पहात-पहात हायवे पर्यंत चालत जात असताना झाडे लावलेली आहेत त्याच्या वरच्या बाजूला वनव्यांणी संपूर्ण गवत, त्याभागामध्ये असणारी झुडपे जळून खाक झाली होती. या वणव्याबद्दल विचारले असता, कोणी अज्ञातानी वणवा लावला होता, आगीचे लोळ आम्हाला वाडीतून दिसले. त्यावेळी संतोष बांदरे, प्रकाश जाडे, रविंद्र मोरे, महादेव आदावडे, प्रवीण पागडे, सुरेश पवार, गजानन खेराडे, डॉ.पाणकर आदी ग्रामस्थांनी जावून झाडापर्यंत येणारा वणवा विझविला.
           हे सर्व पाहिल्या नंतर असे वाटले की कोकणाला वणव्याचा शापच आहे की काय? कारण या दिवसामध्ये वणवे अधिक लागतात की लावतात तेच कळत नाही. बरेचसे लोक आपापल्या परीने वृक्षांची लागवड करतात, त्यांना जीवापाड जपतात, संगोपन करतात व अचानक असे ऐकायला मिळते की वणव्यांमध्ये बाग जळून खाक झाली. किती वाईट वाटत असेल ती बाग फुलविणार्या कुटुंबाला, शब्दात न सांगता येणारी गोष्ट.... तोच वणवा वेळीच विझविला नसता तर.... या तीन वर्षांपासून मेहनत घेऊन वाढविलेली झाडे नष्ट झाली असती.
     श्री समर्थ बैठक चिपळूण यांनी गुहागर बायपास रोड, एनरॉन रोड या ठीकाणी वृक्षारोपण करून  एक आदर्शच सर्व समाजासमोर  ठेवला आहे. ही सर्व झाडे सर्वांना आज आपणाला सावली देत उभे आहेत. यातून आपण एकच बोध घेऊया की एक झाड लावून त्याची जोपासना करूया व आपल्या पृथ्वीवर हिरवाई आणूया.

               शेवटी सांगावसं वाटतंय की ग्लोबल वार्मिंग या महाभयंकर संकटाशी सामना करण्यासाठी प्रत्येकाने अशापद्धतीने किमान एक झाड लावून त्याची तीन वर्षे जोपासना केली तर , आपली ही वसुंधरा वाचेल अन्यथा ग्लोबल वॉर्मिंग या महाभयंकर राक्षसाशी सामना करताना नष्ट होईल पर्यायाने आपली सजीव सृष्टी नष्ट होईल. याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला हवा.
        
                  श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग, जि. रायगड यांच्या माध्यमातून खूप ठिकाणी वरील प्रमाणे वृक्ष लागवड व संगोपनाचे कार्य करीत आहेत. तसेच स्वच्छता अभियान आणि पाणी आडवा पाणी जिरवा या सारख्या सामाजिक बांधिलकी जोपासणारे कार्यक्रम करीत आहात त्यांच्या या कार्याला निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि ग्लोबल चिपळूण टुरिझम चा सलाम...,,,,,



 श्री समर्थ बैठक परिवार चिपळूणच्या सदस्य यांनी मोरेवाडी डोंगरावर तीन वर्षांपूर्वी प्रथम वृक्षारोपण केले व त्यांच्या रक्षणासाठी झाडांना हिरवे कापड लावले.



आज तीन वर्षांनंतर हीच झाडे पहा.श्री समर्थ बैठक परिवार चिपळूणच्या सदस्य यांनी घेतलेली मेहनत.


एप्रिल 2020 मध्ये लागलेला वणवा,वेळीच विझविला त्यामुुुळे लागवड केलेली  झाडे वाचली.



डोंगरावर जाण्यासाठी तयार केलेली वाट.


पिंपळाला पार करण्यासाठी दगड माती लावीत असताना.



डोंगरातून लावलेली झाडे व पायथ्याशी असणारी मोरेवाडी.


झाडांना पाण्याची व्यवस्था .

पिंपळाला पार करण्यासाठी डोंगरातून दगड शोधून उतारावरून सावकाश आणताना.

झाडे लावलेल्या ठिकाणावरून पेढे-मोरेवाडी व वाशिष्ठी नदी तसेच पुढे गोवळकोट,मिरजोळी.

डोंगर उतारावर केलेली झाडांची लागवड,खाली पायथ्याला मोरेवाडी.
वणव्यात जळून गेलेली झाडे व गवत.(माहिती घेताना विलास महाडीक)

झाडांजवळून समोरील दृश्य -रेल्वे ट्रॅक वर रेल्वे,समोर शेतीची मशागत केलेलीं, पुढे वाशिष्ठी नदी,त्यापुढे गोविंदगड व पाण्याची टाकी दिसत आहे.

विलास (भाई) महाडीक
कार्याध्यक्ष
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ,महाराष्ट्र. मोबा. ९४२२३७६४३५

Comments

  1. To understand nature, the umbilical cord must be in harmony with nature....

    ReplyDelete
  2. भाई, मोठे प्रशंसनिय काम आहे.
    तुकाराम टेरवकर ९६३७६६०५९०

    ReplyDelete
    Replies
    1. very nice efforts . Hats off to all sadhak from ANIS PARIWAR MAHARASHTRA.... machindranath munde

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

कोणत्या झाडाचा उपयोग कोणते पक्षी कसा करतात?

विनाशाच्या उंबरठ्यावर- एक मखमली सौंदर्य अन जैवविविधता- *मृगाचा किडा..rain bug, रेन बग

गणपतीच्या पुजनासाठी लागणाऱ्या २१ प्रकारच्या वनस्पतींची पत्री ( पाने )त्यांचे औषधी गुणधर्म