जागतिक पर्यटन दिना निमित्त
27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन.
चिपळूण तालुका रत्नागिरी जिल्हयातीलच नव्हे तर कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आहे. संपूर्ण क्षेत्रात आघाडीवर असणारे चिपळूण शहर आहे. सर्वधर्म समभावाचा सुरेख संगम चिपळूण तालुक्यामध्ये पहावयास मिळतो.
चिपळूण मधील पर्यटन
1) ओवळी येथील मंदिर- मंदिर व देवळासभोती असणारी देव किंजळ झाडाची वनराई पहाण्या सारखी आहे. उंच निलगिरी सारखी सरळ वाढणारी झाडे ही झाडे फक्त या देवळाच्या परिसरात आहेत, बाहेर ही झाडे होत नाहीत असा गावकर्यांचा विश्वास व श्रद्धा आहे.
2) चिपळूण जवळील कळकवणे गावाशेजारी दादरचे श्रीराम-वरदायिनी मंदिर- दादर येथील श्रीदेवी रामवरदायिनीचे मंदिर भव्यदिव्य आणि देखणे आहे. जयपूर हून रामवरदायीनी, श्री वाघजाई देवी आणि श्री महिषासुरमर्दीनी यांच्या मूर्ती आणल्या आहेत देवींच्या घडविलेल्या मूर्ती, बारा íज्योतिर्लिंगांचे दर्शन, डोळे दिपवणारे रंगकाम, मंदिर परिसरातील देवराई, उद्यान वैशिष्ट्यपूर्ण आहे.
3) तिवरे येथील गंगाकुंड - तिवरे गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गंगेचीवाडी भागात, खडकाळ नदी प्रवाहाच्या तीरावर ‘गंगाकुंड’ आहे. या कुंडात दर तीन वर्षांनी कार्तिक महिन्यात गंगा उगम पावते आहे. या पर्वणी काळात गंगास्नानास भाविक, जिज्ञासू, पर्यटक यांची येथे रीघ लागलेली असते. चिपळूण बस डेपोमधून गंगा आगमन झाल्यापासून निर्गगम होईपर्यंत बस सेवा च्या फेऱ्या चालू असतात.
4) टेरव मधील भवानी मंदिर- चिपळूणपासून ८ कि.मी. अंतरावर सह्याद्री डोंगर पठारावर सुंदर देखणं असं भवानी मातेचे मंदिर आहे. नवरात्र उत्सव मध्ये येथे नऊ दिवस नवरात्र उत्सव असतो. मंदिरातील देवी भवानीची मूर्ती काळ्या पाषाणा मधील देखणी व सुंदर आहे.
6) महाकाली देवस्थान कुंभार्ली - श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली देवस्थान आहे. मंदिरातील लाकडी कोरीव काम पाहाण्यासारखे आहे. नवरात्री येथे देवींची ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी असते. या वेळी तीन गावचे मानकरी देवीची सेवा करण्यासाठी मोठमोठ्या हुद्यावर असणारी मंडळी, या कालावधीत रजा टाकून सेवेसाठी हजर असतात.
7)शिरंबे येथील तळ्यातील श्रीमल्लिकार्जुन देवस्थान - चिपळूण तालुक्यातील वीर-देवपाट मार्गावरील शिरंबे गावात ‘स्वयंभू श्रीदेव मल्लिकार्जुन’ हे श्रीशंकरांचे मंदिर तळ्याच्या मधोमध वसलेले आहे.चिपळूण पासून 37 किमी अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिर समूहात गावचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस देवराई आहे.श्रावण महिन्यात हा मंदिर परिसर गजबजलेला असतो. अनेक भाविक मंडळी दर्शनासाठी येतात.गाभाऱ्यात शिवपिंडी आहे.शिवपिंड च्या चारही बाजूने बाराही महिने पाणी असते.
8) वीर देवपाट चा बारमाही वहाणारा धबधबा - चिपळूण पासून 43 किमी अंतरावर हा बारमाही वाहणारा धबधबा आहे. 2 टप्प्यात विभागलेला हा धबधबा आहे. छोटी मुले महिला यांना धबधब्याचा आनंद घेण्यासाठी 2 ऱ्या टप्प्यात जाता येते. मूळ धबधबा येथे पाणी खोल आहे.धबधव्यावर जाताना मल्लमर्दन चे सुंदर देवस्थान आहे. जवळच खाडी आहे.
9) श्रीदेवी विंध्यवासिनी - चिपळूण पासून 3 किमी अंतरावर रावतळे येथील डोंगरात श्रीदेवी विंध्यवासिनी मंदिर आहे. देवीची यादवकालीन मूर्ती ही महिषासुरमर्दिनीस्वरूप शाळीग्राम शीळेतील अष्टभूजा मूर्ती आहे. कार्तिकस्वामींची बाराव्या शतकातील शाळीग्राम शीळेतील सहामुखी (षडानन), दुर्मीळ, महाराष्ट्रातील सर्वात सुबक आणि देखणी मूर्ती याच मंदिरात आहे.मंदिरात जाण्यापूर्वी समोरच दगडी तटबंदीचे सूंदर तलाव आहे.
10)श्रीक्षेत्र परशुराम संस्थान - भगवान श्रीविष्णूंच्या दहा अवतारा पैकी सहावा चिरंजीव अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण भूमीच्या निर्मात्याचे भगवान परशुराम यांचे महेंद्रगिरी पर्वत क्षेत्रात सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेले हे मंदिर आहे.
मंदिराच्या स्थापत्यात मंदिर, मशीद आणि चर्च रचनेचा सुंदर संगम साधला गेला आहे. मंदिराबाहेर बाणगंगा तलाव, उजव्या सोंडेचा गणपती, दीपमाळ,श्रीदेवी रेणुकामाता मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ-काम-परशुराम अशा काळ्या पाषाणाच्या तीन सुबक मूर्ती आहेत. कर्नाटकातल्या विजयनगर-होयसळ घराण्यात राजचिन्ह म्हणून वापरले जाणारे गंडभेरुंड शिल्प, पाच प्राण्यांच्या विविध अवयवांपासून बनलेला शुभसूचक प्राणी शरभ, शीलालेख आदी रेणुकामाता मंदिराच्या खांबांवर आपणांस पाहता येतात. रेणुका मातेच्या मंदिराशेजारी चारी बाजूने अंकन केलेली शिळा(विरघळ )आहे. अशी शिळा क्वचितच पाहावयास मिळते.
11) पेढे परशुराम ग्रामदैवत श्रीधावजी व जाखमाता मंदिर- परशुराम मंदिरा मध्ये जि.प शाळेच्या बाजूने उतरण्यास पाखाडी सुरु होते त्याच्या डाव्या बाजूला हे प्रशस्त धावजी मंदिर आहे. या मंदिरा समोर पेशवेकालीन वैशिष्टपूर्ण बांधणीची प्रेक्षणीय विहिर आहे. तिला धावजीची विहिर म्हणतात. पाखाडी नजिकच विठ्ठल मंदिर आहे. धावजी मंदिराच्या दुर्गवाडी मध्ये रस्ता जातो तेथे तळ्यावर दत्तमंदिर आहे. येथील तळ्यात बारमाही धबधबा आहे. दातमंदिराच्या मागील भागात 3 ध्यान गुहा आहेत. पुढे पर्वतेश्वर मंदिर आहे. समोरच्या डोंगरवर दगडी दीपमाळ आहे.
12) कामधेनू मंदिर - पेढे गावात जागृत कामधेनू मंदिर आहे. भारतातील मोजक्याच दुर्मिळ कामधेनू मंदिरापैकीहे एक मंदिर आहे. मंदिराच्या समोर भागातून सवतसडा धबधबा पहावयास मिळतो. या मंदिरा समोरील भागातून पेशवेकालीन पाखाडीने परशुराम मंदिरात पायी जाण्याचा मार्ग होता. पण सध्या मुंबई गोवा हायवेचे काम केले त्यामुळे या पाखाडीने जाता येत नाही. पेढे परशुराम ग्रामस्थ ही पाखाडी व्हावी म्हणून हायवेचे वरिष्ठ अधिकारी व मंत्री पातळीवर प्रयत्न करीत आहेत. या गावात चिपळूण तालुक्यातील महाडीक यांचे पहिले श्रीपरशुराम सान्निध्य निसर्गपर्यटन केंद्र सुरु आहे.
13)विसावा पॉईंट - चिपळूण शहरापासून ८ किमी. अंतरावर निसर्गरम्य विसावा पॉईंट आहे. या पॉईंटवरून चिपळूण शहर दर्शन तसेच गोवळकोट दर्शन, वाशिष्टी खाडी दर्शन, खाडीतून जाण्याऱ्या बोटी, खाडी शेजारून बोगद्यामधून बाहेर येण्याऱ्या कोकण रेल्वे यांचे विहंगम दृश्य डोळयात, मोबाईल मधून साठवता येते.संध्याकाळी सूर्यास्त दर्शन पहाता येते.
14) सवतसडा धबधबा - चिपळूण पासून 5 किमी अंतरावर मुंबई गोवा महामार्गालगत पावसाळ्यात या मार्गांवरून जाणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हा धबधबा आहे. पावसाळी पर्यटन साठी उत्तम ठिकाण आहे. पेढे मधील श्री महाडीक यांचे श्रीपरशुराम सान्निध्य निसर्ग पर्यटन केंदात राहून निवास व भोजनाचा आस्वाद घेवून जवळील पर्यटनाचा आनंद घेता येतो.
15)गोविंदगड किल्ला - दोन एकर क्षेत्रात विस्तारलेला हा किल्ला आहे.. करंजेश्वरी मंदिराच्या बाजूने ३४२ पायऱ्या चढून किंवा गाडीमार्गाने किल्ल्यावर पोहोचता येते. एकूण १२ बुरुजांपैकी ४ बुरुज सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या चारही बाजू पाण्याने वेढलेला आहेत. . अलिकडे किल्यावर सहा तोफांचे एकत्रित जतन करण्यात आले आहे. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. किल्यावरुन वाशिष्ठी दर्शन व खाडी किनारी असणाऱ्या गावांचे दर्शन होते. या किल्ल्याच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरी चे मंदिर आहे.
16) श्रीदेवी करंजेश्वरी - चिपळूण शहरापासून 3 किमी शहराच्या पश्चिमेस गोवळकोट येथील गोविंदगड किल्ल्याच्या पायथ्याशी आठव्या शतकातील श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरीचे भव्य मंदिर आहे. हे अनेकांचे कुलदैवत असून इतिहासात छत्रपती राजाराम महाराज, राणी ताराबाई, दादोजी मल्हार, पटवर्धनांचे मूळ पुरुष हरभट आदि अनेक महापुरुषांनी देवीचे दर्शन घेतले आहे.या देवीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक ही हा शिमगोत्सव पहाण्यासाठी येतात. या ठिकाणी सुसज्ज व अद्ययावत असे भक्तनिवास आहे.
17) ‘लोटिस्मा’चे वस्तुसंग्रहालय आणि कलादालन - चिपळूणच्या लौकिकात भर घालणारे, येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारलेले वस्तुसंग्रहालय आणि कलादालन प्रकल्प जिज्ञासूंनी आवर्जून पाहावे असे आहे.
दोन लाख वर्षांपूर्वीच्या हत्यारांसह पुरातन वस्तूंचा खजिना पाहायला मिळणारे मुंबई ते गोवा दरम्यानचे हे एकमेव संग्रहालय आहे. या संग्रहालयात दोन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन हत्यारे, हडाप्पा, इनामगाव, तेर येथील उत्खननात सापडलेली भांडी व अवशेष, मौर्यकाळापासून स्वतंत्र भारतापर्यंतची विविध नाणी, जुने दस्तऐवज, विविध गावातील वीरगळ, दगडी पाण्याची भांडी, जाती, भात दळण्याचे घरट, दगडी उखळ, जुने लाकडी नक्षीकाम केलेले देवळाच्या मंडप्या आहि.पूर्वीच्या काळातील कोकणी शेतकऱ्यांच्या घरातील भांडी, मूर्ती, हत्यारे, लाकडी वजने पाहाता येतात.
कलादालनात राज्यकारभार, लष्करी कामगिरी, वैचारिक नेतृत्व, समाजकारण, संस्कृती, इतिहास, संशोधन, शिक्षण, साहित्य, युद्धनीती, क्रीडा, अध्यात्म, नाट्य-संगीत आदि क्षेत्रात कोकणाचे सामर्थ्य अधोरेखित करणाऱ्या अनेक व्यक्तींची तैलचित्रे आहेत.
18)तुरंबवची श्रीशारदादेवी - चिपळूण पासून सुमारे 29 किमी अंतरावर देवता श्रीदेवी शारदेचे मंदिर तुरंबव येथे आहे. अखिल कोकणपट्टीतील हे एकमेव मंदिर आहे.न नवरात्रोत्सव कार्यक्रम व मंदिराचे सुशोभिकरण पहाणेसाठी अनेक भक्त आपला नवस फेडणेसाठी येथे येतात. या मंदिरातील ढोलाच्या तालावर जाखडी नृत्य पहाण्या सारखे असते.
19) श्रीदेवी महालक्ष्मी - साळूबाई- चिपळूण पासून6 किमी अंतरावर शहराच्या पश्चिमेकडील डोंगरावर मिरजोळी गावाच्या डोंगरावर हे मंदिर आहे. मंदिर परिसरात काळ्या पाषाणावर कोरलेल्या विविध देवदेवतांच्या मूर्तींचा व शिल्पांचा समूह आहे.
20) गौतमेश्वर मंदिर- शहराच्या मध्यभागी भागात असलेले दुर्मिळ शिवनादाची प्रचिती देणारे एकमेव श्री गौतमेश्वर मंदिर आहे. पूर्वी या मंदिराच्या समोर सूर्यकुंड नावाचा तलाव होता. आता या जागेवर साने गुरुजी उद्यान आहे.
21) गांधारेश्वर मंदिर- वाशिष्ठी तीरावर श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट अंतर्गत हे स्वयंभू मंदिर आहे. हे देवस्थान जागृत व ऐतिसिक आहे. मंदिराच्या प्रशस्त आवारात आकर्षक काळ्या पाषाणांची बांधीव दीपमाळ आहे. दर सोमवारी भाविकांची दर्शनासाठी व अभिषेकाची रीघ लागते. मंदिराच्या उत्तरेस वाशिष्ठी नदीचा खोल डोह आहे. समोरच चिपळूण रेल्वे स्थानक आहे.
22) रामेश्वर मंदिर- हे पुरातन जागृत देवस्थान आहे. रामेश्वर तलावात छत्रपती शिवाजी महाराज वसमर्थ रामदास स्वामी यांनी स्नान करून परशुराम दर्शनास गेल्याचा उल्लेख समर्थ चरित्रात आढळतो.
23) चिपळूणच्या चारही दिशांना गणपती मंदिर आहेत.1) उक्ताडचा गणपती2) मळ्यातील स्वयंभू श्री गणेश3) मुरादपूर येथील गणेश मंदिर4) पागेतील श्री गणपती
24) चिपळूण शहराच्या हद्दीत जामे मस्जीद, दादर मोहल्ला मस्जिद, मिठागरी मोहल्ला मस्जिद, साठे मोहल्ला मस्जिद, बहाद्दूरशेख मस्जिद, मापारी मोहल्ला मस्जिद, कास्कर मोहल्ला मस्जिद, मुकादम मोहल्ला मस्जिद, कसाई मोहल्ला मस्जिद, उक्ताड मोहल्ला मस्जिद, जुम्मा मस्जिद, मुनारा जामे मस्जिद, तकिया मस्जिद,
याशिवाय सुफी संतांच्या कबरी अर्थात दर्गेही आहेत. यात लोटनशहा, शेखसमसुद्दीन, कालेशहा बाबा,सय्यद मुरादशहा, शेख बहाद्दूर, पीर शकुला, मुरादखान, सय्यद मुस्तीमीन, शहा ख्वाजा कमालुद्दीन आणि बुर्हानशहा यांचा समावेश होतो.
25) गोविंदराव निकम स्मारक - वहाळ फाटा येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या संकुलात कापसी नदीच्या तीरावर निसर्गरम्य परिसरात शिक्षणमहर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम यांचे स्मारक आणि वैकुंठेश्वर मंदिर आहे. समाधी स्थळाजवळ वास्तुसंग्राहल ही आहे.
26) वाशिष्ठी मधील जलपर्यटन - खाडी, संथ पाणी, त्यामधून बोटींग करणे म्हणजे आनंदच. चिपळूणमध्ये ग्लोबल चिपळूण या संस्थेच्या माध्यमातून बोटींगची सोय उपलब्ध आहे. खाडीतील कांदळवन तेथील जैवविविधता ही अभ्यासता येते. वाशिष्ठी नदी व जगबुडी यांचा होणारा संगमही पहाता येतो. नदीमध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब मनाला मोहून टाकतात.येथील मगरी ओहोटी दरम्यान वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर पहुडलेल्या सहज नजरेस पडतात. जगबुडी नदीपात्रातून तुंबाड या गावी जाता येते. तुंबाडचे खोत कादंबरी चे लेखक श्री ना. पेंडसे यांनी या गावातून लिहिली.
27) शिव-शिल्पसृष्टी डेरवण - चिपळूणपासून २० कि.मी. अंतरावर, महाराष्ट्रातील पहिली श्रीशिव शिल्पसृष्टी डेरवण येथे श्रीसंत सीतारामाबुवा वालावलकर ट्रस्टने सन १९८५ साली उभारली आहे. शिवरायांचे बालपण ते शेवट पर्यंत साकारलेले छत्रपतींच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग पर्यटकांना खिळवून ठेवतात.
28) पिंपळेश्वर मंदिर- चिपळूणपासून 8 किमी अंतरावर धामणदेवी गावात हे दत्त मंदिर आहे. या मंदिरात एकाच चबुतऱ्यावर वड, पिंपळ, बेल, उंबर, आवळा अशी एकत्र झाडे आहेत. शांत वातावरणव शेजारून वाहणारी वाशिष्ठी खाडी असा नजारा पहावयास मिळतो. धामणदेवी धक्का मंदिरापासून थोडयाच अंतरावर आहे. येथून सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पहावयास मिळते.
श्री विलास (भाई ) महाडीक
निसर्गप्रेमी, पर्यटन प्रेमी, पेढे- चिपळूण.
मोबा.9422376435
Comments
Post a Comment